MNS : ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, मुंबई आणि शेजारील महानगरांमध्ये मराठी भाषेवर अन्यायाच्या घटनांमध्ये वाढ!
मागील काही दिवसांत मुंबई व शेजारील ठाण्यात मराठी-हिंदी भाषेच्या वादाच्या घटना घडल्या आहेत. आता दहिसरमध्येही मराठी-हिंदी भाषेवरून वाद झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
दोन परप्रांतीय बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या शैलीने हा विषय हाताळला. या हस्तक्षेपामुळे दोन्ही बाऊन्सर्सनी मराठीत माफी मागितली. दहिसरमधील एका हॉटेलात मराठी माणसावर झालेला भाषिक अन्याय मनसेने थांबवला.
मुंब्र्यातही अशाच प्रकारच्या घटनेत फळ विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला होता. मराठी तरुणाने “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायला हवं,” असं ठामपणे सांगितलं. मात्र, त्यावेळी जमावाने त्याला जबरदस्तीने माफी मागायला लावली.
कल्याणमध्ये घडलेल्या एका प्रकारात, मराठी कुटुंबावर अमराठी कुटुंबाकडून अत्याचार झाला होता. वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठी शेजाऱ्यांना अपमानास्पद शब्दांनी लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर बाहेरून गुंड बोलावून लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली.